मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

महात्मा जोतिबा फुले

महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म झाला तेव्हा इंग्रजांनी भारतात बस्तान बसवण्यास प्रारंभ केला होता. अज्ञान आणि धर्माचा पगडा यामुळे बहुसंख्य जनता पुरोहित वर्गाच्या शोषणला बळी पडत होती. अशा स्थितीत बहुसंख्य जनता अज्ञान आणि रूढी-परंपरांमध्ये पिचून गेली होती. या सगळ्यांच्या विरोधात समाजाला जागृत करण्याचे, त्याला ज्ञानी करण्याचे कार्य महात्मा फुले यांनी हाती घेतले. त्यासाठी शाळा काढल्या. त्यांच्या या कार्याला तीव्र विरोध झाला. त्यांना वाळीत टाकण्याचे प्रयत्न झाले. मोठ्या निर्धाराने त्यांनी समाजसुधारणेचे कार्य चालू ठेवले. पिढ्या न्‌ पिढ्या शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या समाजाला त्यांच्या या कार्यामुळे शिक्षणाची आणि प्रगतीची संधी मिळाली.

महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म 1827 मध्ये झाला. वडिलांनी त्यांना शाळेत घातले. मन लावून अभ्यास करून जोतिबा वर्गात पहिला क्रमांक पटकावू लागले. त्याच वेळी शाळेतील मुले ख्रिस्ती होणार, बाटणार, अशी अफवा उठवण्यात आली. त्यामुळे लोकांनी मुलांना शाळेतून काढून घेतले. जोतिबांच्या वडिलांनी देखील घाबरून तसेच केले आणि त्यांना शेतातील कामाला लावले. चौदाव्या वर्षी ते पुन्हा शाळेत जाऊ लागले आणि 21 व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्या वेळी मॅट्रिक होणे म्हणजे खूपच मोठी कर्तबगारी होती. वडिलांना जोतिबांचा अभिमान वाटला. आता मुलगा नोकरी करून चांगला पगार मिळवेल, असे त्यांना वाटत होते; परंतु शिक्षणामुळे ते विचार समाजाचा विचार करू लागले होते. त्यांच्या डोक्‍यात काही वेगळेच विचार घोळू लागले होते.

त्यांचा एक मित्र होता- जिवाभावाचा- उच्च जातीतला. त्याचे लग्न झाले. सजवलेल्या घोडागाडीतून वरात निघाली. वरातीत जोतिबा मोठ्या आनंदाने सहभागी झाले. त्यांच्या मित्राचेच लग्न होते. काही जणांना त्यांचे मिरवणे खटकले. त्यांनी जोतिबांच्या बखोटीला धरले आणि शिवीगाळ करत त्यांना वरातीतून हाकलून दिले. खालच्या जातीतील तरुण आमच्यात येऊन मिरवतोच कसा, असा त्यांचा प्रश्‍न होता. असे होऊ लागले, तर धर्म बुडेल असे त्यांचे म्हणणे होते. जोतिबा तसेच घरी आले. आपण कोणता गुन्हा केला, आपल्याला बाहेर का काढले, असे प्रश्‍न त्यांना सतावत होते. जोतिबा स्वस्थ बसले नाहीत. ते त्यांच्या शिक्षकांकडे गेले. त्यांनी जोतिबांना शांत केले. काही ग्रंथ वाचायला दिले. कोणत्याही ग्रंथात, अमकी व्यक्ती श्रेष्ठ आणि दुसरी कमी असे लिहिले नव्हते. मग हे लोक असे का वागतात, असा प्रश्‍न त्यांना पडला. कोणीही श्रेष्ठ नाही आणि कोणी कनिष्ठ नाही, सगळी माणसे सारखीच असताना स्वतःच्या स्वार्थासाठी काही जणांनी माणसांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी वर्गवारी केल्याचे त्यांच्या लक्षात आले. धर्मानेच हे सांगितले आहे, अशी इथल्या लोकांची समजूत झाली होती. लोकांना या गैरसमजातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची आवश्‍यकता आहे हे लक्षात आल्यामुळे त्यांनी सर्व जाती-धर्माची मुले व मुलींसाठी शाळा सुरू केल्या. पालकांनी मुलांना वाचनाची आवड लावली पाहिजे, असे त्यांचे सांगणे होते. वाचनातूनच शहाणपण येते आणि माणूस विचार करू लागतो, असे ते सांगत.
याबाबत त्यांनी म्हटले आहे,
थोडे दीन तरी मद्य वर्ज्य करा ।
तोच पैसा भरा ग्रंथासाठी ।।
ग्रंथ वाचताना मनीं शोध करा ।
देऊं नका थारा वैरभावा ।।

वाचनाचा आणि ज्ञान मिळविण्याचा अधिकार सर्वांना आहे, हेच त्यांनी यातून स्पष्टपणे सांगितले.
शिक्षक हे प्रशिक्षित असले पाहिजेत, असे त्या काळात त्यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सहजपणे मिसळणारे, त्यांच्या गरजांशी, त्यांना मोठेपणी काय व्हायचे आहे याचा आडाखा बांधून त्यांना मार्गदर्शन करणारे, त्यांच्याशी समरस होणारे शिक्षक असे त्यांचे मत होते. एवढेच नव्हे तर शिक्षणात आरोग्य आणि शेती हे विषय आवर्जून असले पाहिजेत, असे त्यांनी त्या काळात सांगितले होते. मुलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण व्हावा म्हणून लेखन-वाचनाबरोबरच हिशेबाची माहिती, नीतिमूल्ये आणि शेतकीच्या पाठाबरोबरच मुलांना व्यवहार कळला पाहिजे, यावर त्यांचा भर होता. विद्यार्थ्यांसाठी बक्षिसे, शिष्यवृत्त्या दिल्या जाव्यात, तसेच शिक्षकांसाठी जादा अनुदान आणि भत्ते देण्यात यावेत, असे त्यांचे सांगणे होते. जेणेकरून शिक्षणाचा प्रसार वेगाने होईल. स्त्रियांमध्ये प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणखी मोठ्या प्रमाणावर होईल अशा प्रकारच्या उपाययोजनांना सरकारने संमती द्यावी, यासाठी ते सदैव प्रयत्नशील होते.

देशात इंग्रजांची राजवट सुरू झाली होती. त्या काळात लोकांवर कर्मकांडांचा खूप प्रभाव होता. शिक्षण नव्हते. आधुनिक विज्ञानाची माहिती नव्हती. त्यामुळे धर्माचे नाव घेऊन तू पूजा घातली नाहीस, कर्मकांड केले नाहीस, दक्षिणा दिली नाहीस तर तुझे वाईट होईल, तुझ्या कुटुंबाला त्रास होईल, असे लोकांना सांगितले जाई. अज्ञानामुळे लोकांना हे सगळे खरे वाटत असे. मग धार्मिक विधी करणारे धूर्त लोक कष्ट करणाऱ्यांकडून धान्य, दक्षिणा मिळवत असत. या विरुद्ध जोतिबांनी मोठी चळवळ उभी केली. लोकांमध्ये जागृती केली.
ते सांगत,
सोड गर्वास, लाग मार्गास ।।
जाळ या खोट्या धर्मास ।।
जपले बहुत एकीस ।।
देव आणि माणूस यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या पुरोहितांना त्यांचा विरोध होता. भक्त देवाशी थेट संपर्क साधू शकतो. त्यासाठी मध्यस्थाची गरज नसते. देवाच्या नावाने माजवलेले देव्हारे, अंगारे, नवस, पोथ्या, पुराणे यांना त्यांचा विरोध होता.

देवाच्या शोधामागे लागून मानवाने आपले आयुष्य व्यर्थ घालवू नये, असे त्यांचे सांगणे आहे. ते म्हणतात,
कोठें आहे स्वर्ग ।
पाहिले ते कोणी ।
भिऊं नका मनी ।।
पिढ्यान्‌पिढ्या सगळेच हक्क नाकारलेल्या समाजाला त्या वेळी सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासही परवानगी नव्हती. या समाजाला जोतिबांनी जवळ घेतले. आपल्या घरातील पाण्याचा हौद त्यांच्यासाठी खुला केला.

1888 मधील गोष्ट. इंग्लंडची राणी व्हिक्‍टोरिया आणि तिचा मुलगा प्रिन्स आर्थर (ड्यूक ऑफ कॅनॉट) पुण्यात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मोठे जहागीरदार, रावबहादूर, बडे अधिकारी, शास्त्री, पंडित अशी बडी मंडळी त्यांच्या दरबारात हजर झाली होती. सगळीकडे कडेकोट बंदोबस्त होता. प्रिन्स आर्थरचे आगमन होताच सनया वाजल्या, ढोल वाजले; सलामी, मुजरे झाले. प्रिन्सची स्वारी ऐटीत आली आणि खास बनवलेल्या सिंहासनावर विराजमान झाली. दरबार सुरू झाला. इतक्‍यात एक व्यक्ती दरवाजावर आली. पायात कातडी चपला, कंबरेला धोतर, अंगात ठिगळे लावलेली पैरण, डोक्‍यावर चिंध्या झालेले मुंडासे, खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी अशा वेशात ती व्यक्ती आली. पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांना वाटले कोण हा एवढ्या मोठ्या दरबारात घुसतो आहे. त्या व्यक्तीने कमरेला हात घातला आणि कागदाची सुरळी काढून दाखवली. ती समारंभाची निमंत्रणपत्रिका होती. दीनदुर्बलांसाठी लढणारे, त्यांना सन्मान मिळवून देणारे महात्मा जोतिबा फुले थेट दरबारात दाखल झाले. युवराजाला येथील शेतकऱ्याची अवस्था दाखविण्यासाठी ते शेतकऱ्याच्या वेशात आले होते. शेतकऱ्यांची स्थिती अतिशय पोटतिडकीने त्यांनी युवराजासमोर मांडली. इथे नटून आलेले लोक म्हणजे इथली प्रजा नसून दिवसरात्र राबून, घाम गाळून शेत पिकवणाऱ्या इथल्या प्रजेला आजही अर्धपोटी राहावे लागत आहे. अंग झाकण्यापुरते कापडही त्यांना मिळू शकत नाही, ही व्यथा त्यांनी मांडली.
समाजाला जागे करण्यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. शिवाजी महाराजांबद्दल त्यांना फार आदर होता. महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी महात्मा जोतिबा फुले एकदा रायगडावर गेले. तिथे सगळीकडे उंच गवत वाढले होते. बांधकामाचे काही अवशेष इकडे तिकडे विखुरलेले. गडावर सगळीकडे फिरून त्यांनी महाराजांची समाधी शोधून काढली. त्या परिसराची त्यांनी स्वच्छता केली. समाधीच्या स्थितीबद्दलची माहिती त्यांनी दीनबंधू या त्यांच्या साप्ताहिकातून दिली. शिवस्मारकाची कल्पना त्यांनी मांडली. शिवाजी महाराजांची कर्तबगारी सांगणारा पोवाडा त्यांनी लिहिला.

महात्मा जोतिबा फुले आयुष्यभर समाजातील दुर्बलांना जगण्याचा हक्क मिळावा म्हणून कार्यरत राहिले. धर्माच्या जोखडातून लोकांना मुक्त करण्यासाठी जागृती करत राहिले. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 11 मे 1888 मध्ये मुंबईत लोकांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना महात्मा म्हणून गौरवले. अशा या महान समाजसुधारकाचे 28 नोव्हेंबर 1890 रोजी निधन झाले.
- सुहास यादव